गुरे चारायला जंगलात गेलेल्या इसमावर वाघाचा हल्ला

Thu 25-Sep-2025,09:15 AM IST -07:00
Beach Activities

जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली

अहेरी:खांदला गावातील गुरे चारायला जंगलात गेलेल्या ७६ वर्षीय इसमाच्या अचानक वाघाशी सामना झाला. वाघाने अचानक गुराख्यावर हल्ला चढवीला. त्याला प्रतिउत्तर म्हणून गुराख्याने हल्ला परतावून लावला. काही वेळ दोघांमध्ये झुंज झाली, परंतु शेतकरी भारी पडल्याने वाघाने पड काढला. गुराखी आणि वाघांमध्ये झालेला हा थरार गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी तालुक्यात येत असलेल्या कमलापूर वनपरिक्षेत्रातील चिरेपल्ली बीटात २४ सप्टेंबर रोजी सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमध्ये गुराखी शिवराम गोसाई बामनकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवराम गोसाई बामनकर हे सकाळच्या सुमारास खांदला गावातील जनावरे चराईसाठी घेऊन गेले होते. राजाराम उपक्षेत्रातील चिरेपल्ली बीटात जनावरे चराई करीत असताना त्या ठिकाणी दबा धरून बसलेल्या वाघाने शिवराम यांच्यावर झडप घातली. त्यांनी वाघाचा हल्ला परतवण्याच्या प्रयत्न केला. दोघांमध्ये बराच वेळ झुंज झाली. यात गुराखी शिवराम वाघावर भारी पडल्याने वाघाने जंगलात पळ काढला. मात्र, यात शिवराम गंभीर जखमी झाला. रक्तबंबाड अवस्थेत कसाबसा शिवरामने गाव गाठला. त्याच्या शरीरावर ठिकठिकाणी गंभीर जखमा झालेल्या आहेत. त्यांनी थराराची आपबीती कुटुंबीयांना व नागरिकांना सांगितली. लगेच त्याला राजाराम येथील आरोग्य पथकात दाखल केले. येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्राथमिक उपचार करून रूग्णवाहिकेने उपजिल्हा रुग्णालय आहेरी येथे हलविले. ७६ वर्षीय शिवरामने वाघाशी दोन हात करून हल्ला परतावून लावला. विशेष म्हाणजे म्हातारपणात देखील शिवरामने वाघाच्या हल्ल्याचा जोरदार सामना केला आणि त्याला पळूण जाण्यास भाग पाडले. धाडसी गुराखीने मोठ्या हिमतीने वाघाचा प्रतिकार करून त्याला परतावून लावल्याने हा चर्चेचा विषय ठरला असला तरी सध्या या भागात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवराम गोसाई बामनकर चे जनावरे चराईसाठी जंगल परिसरात गेले असता वाघाने हल्ला करुण जखमी केले आहे. त्यामुळे वनविभागाने जखमी शिवराम बामनकर यांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी मुलगी वनिता गजानन बामनकर यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी कमलापुर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .